अकोला येथील एका शिक्षिकेने रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, माझी २५ वर्षीय मुलगी पुणे येथे एका कंपनीत नोकरी करते. तिने मला २९ मे रोजी रात्री फोन करून सांगितले की, ‘माझ्या मित्राने मला नगर शहरातील लालटाकी येथे बोलावून घेतले. माझ्याशी लग्न कर, असे तो म्हणाला. मी नकार दिल्याने मित्र व त्याच्या तीन साथीदारांनी मला जबरदस्तीने पळवून नेऊन एका ठिकाणी डांबून ठेवले आहे’, असे बोलून तिने फोन बंद केला. त्यानंतर मी मुलीस अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने फोन घेतला नाही. त्यामुळे माझ्या मुलीने लग्नास नकार दिल्यानेच तिला तिच्या मित्राने डांबून ठेवले आहे, अशा अशयाची फिर्याद या महिलेने दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत रविवारी रात्री तत्काळ त्या तरुण-तरुणीचा शोध घेऊन दोघांनाही लालटाकी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांंसमोर येताच मुलीने जबाब दिला की, मला कुणीही पळवून आणलेले नसून माझे या तरुणावर प्रेम असल्याने मी मर्जीने आले आहे. मुलीचे हे वाक्य ऐकताच तिच्या आईला मोठा धक्का बसला. त्या महिलेला उपचारासाठी तत्काळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
---------
मुलगी स्नेहालयात दाखल
सदर तरुणीचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी तिला सध्या स्नेहालय संस्थेत दाखल केले आहे. तर तिच्यासोबत असलेल्या तरुणावर सध्या तरी काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. हा तरुण नगरमध्येच राहणारा असून, पुणे येथे हे दोघे जण सोबत काम करत होते. या प्रेम प्रकरणाची नगर शहरात दोन दिवस चांगलीच चर्चा रंगली होती.