अहमदनगर : कोरोनाच्या नियमांमुळे पर्यटन स्थळे बंद असली तरी रविवारी सकाळी बाहेर कुठेतरी, डोंगर, नद्या, टेकड्यांवर जायचे अनेकांनी ठरवले होते. अनेकांनी सकाळीच निसर्गाचा आनंद लुटला, तर अनेकांनी दुपारी जायचा बेत आखला. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे धाकधुक सुरूच होती आणि तसेच घडले. दुपारपासून रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस सुरू झाला. मध्येच ढगांचा कडकडाटही ऐकू येत होता. सकाळपासूनच दाटलेल्या ढगांमुळे सर्वत्र अगदी अंधार पसरलेला आहे.
एकीकडे परतीचा पाऊस सुरू झाला आहे. एक आॅक्टोबरपासून एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने जोरदार पावसाचा पुन्हा इशारा दिला होता. शुक्रवारी वादळी वाºयासह हलका पाऊस झाला. शनिवारी सायंकाळीही थोडासा पाऊस बरसला. रविवारी तर दुपारपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. हा पाऊस अर्ध्यातासापासून सुरूच आहे. हा परतीचा पाऊस आणखी किती मोठा असेल हेही सध्या सांगणे कठीण असले तरी हवामान खात्याने जोरदार पावसाचाच इशारा दिला आहे.
जास्तीच्या पावसामुळे नगर जिल्ह्यातील नदी, तलाव भरले आहेत. सगळीकडे हिरवाई दाटली आहे. अशा स्थितीत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी अनेकजण डोंगर, टेकड्यांवर जाऊन निसर्गाचा आनंद लुटतात. रविवारची संधी साधून अनेकजण सकाळीच बाहेर पडले होते, मात्र त्यांना पावसाने गाठले. तर काहींनी दुपारी जायचा बेत आखला होता. पावसामुळे त्यांनाही घरीच बसावे लागले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना एक दिलासा मिळत असताना जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा कोरोना पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.