शिर्डी : गोदावरी धरण समूहातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे तातडीने भरुन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिर्डी लोकसभा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे.या संदर्भात डॉ. सुजय विखे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून गोदावरी लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. याचा विपरीत परिणाम लाभक्षेत्रातील शेतीक्षेत्रावर झाला. पाण्याअभावी शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना पाण्याच्या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचाही फटका पाण्याच्या आवर्तनाला बसला. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळापत्रकाप्रमाणे आवर्तन मिळाले नाहीच, हक्काच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागले. ही बाब राज्य सरकार आणि जलसंपदा मंत्र्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या भावना आता संतप्त झाल्या आहेत.जिल्ह्यासह राज्यात पावसाचे आगमन चांगल्या पद्धतीने झाले असले तरी, गोदावरी धरणाच्या लाभक्षेत्रात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. सद्यपरिस्थितीत गोदावरी धरण समूहाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरणातूनही गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात असले तरी, लाभक्षेत्रातील बंधारे मात्र अद्यापही कोरडे राहिले आहेत. खरीप हंगाम लक्षात घेवून शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज विभागाकडे दाखल केले आहेत, ही बाब महत्वपूर्ण असतानाही त्याचे गांभीर्य विभागाने घेतलेले नाही.पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडून मान्य होत नसल्याने आता रस्त्यावर येवून आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही, अशा स्पष्ट शब्दात डॉ. विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लाभक्षेत्रातील गावांमध्ये शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकटही अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांची गरज लक्षात घेवून गोदावरी नदी पात्रातून वाहून जात असलेले ओव्हरफ्लोचे पाणी बंधारे आणि कालव्यांद्वारे उपलब्ध करुन न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन गावोगावी सुरु करण्याचा इशारा डॉ. विखे यांनी दिला.(तालुका प्रतिनिधी)
बंधारे भरून न दिल्यास आंदोलन
By admin | Published: August 09, 2016 11:54 PM