पाथर्डी- शहरातील नविपेठ, चौंडेशवरी गल्ली व परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून विज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत असल्याने या ठिकाणच्या तांत्रिक बिघाडाची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा बैठा सत्त्याग्रह करण्याचा इशारा या भागातील नागरीकांनी दिला आहे.शहरातील चौंडेश्वरी गल्ली, नवीपेठ व या लगतच्या परिसरामध्ये सुमारे तीन महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरु आहे. याबाबत वेळोवेळी वरीष्ठ अधिका-याकडे मागणी करुन देखील त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी दुपारी प्रशांत शेळके व नितीन गटाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता निलेश मोरे आणि शहर सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांना घेराव घालुन वारंवार वीज खंडीत होत असल्याबाबत जाब विचारण्यात आला. विज खंडित झाल्यावर ८ तास या भागाकडे वीज कर्मचारी फिरकत नाही. उन्हाळा असल्याने लहान मुले, जेष्ठ नागरीक व रुग्नांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात व्यावसायिक असल्याने त्यांच्यासह ग्राहकांनाही मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. विशेष म्हणजे या भागातील विजबिल थकीत नसुन देखील अधिका-यांच्या बेजबाबदारपणामुळे ग्राहकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. एका आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास येत्या सोमवारी विद्युत वितरण कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आल्या नंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस युसुफ शेख, संजय मेघुंडे, कृष्णा रेपाळ, वैभव माणुरकर, राम शिळवणे, समद शेख उपस्थित होते.
नियमित विज पुरवठ्यासाठी पाथर्डी वीजवितरण कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:44 PM