श्रीगोंदा : शहरातील बायपास रस्त्यालगत अभ्यासिकेवर झालेले अतिक्रमण व पारगाव रस्ता दुरुस्त करण्यास नगर परिषदेकडून होत असलेली टाळाटाळ याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी संभाजी ब्रिगेडने नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिले.
बायपास रस्त्यालगत अभ्यासिका व क्रीडा संकुलाच्या अतिक्रमणामुळे काम अपूर्ण आहे. या अभ्यासिकेवर अतिक्रमण झालेले असून हे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमणे तत्काळ हटवावेत, असे आदेश दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने काय कार्यवाही केली असा सवाल त्यांनी केला.
शहरात नगरोत्थान योजनेंतर्गत ३३ कोटींच्या १७ रस्त्याची कामे तीन वर्षांपासून सुरू आहेत. यामधील पारगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. तसेच मांडवगण रस्ता आणि शनिचौक परिसरातील काम ठेकेदाराने पूर्ण केले नसल्याने खड्डे तसेच ठेवण्यात आल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, शहराध्यक्ष दिलीप लबडे, शांताराम पोटे, अजिनाथ मोतेकर, देवीदास माने, युवराज पळसकर, संदीप कुनगर आदी उपस्थित होते.
फोटो : १५ श्रीगोंदा आंदोलन
श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.