अहमदनगर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांकडून निराशाजनक वागणूक मिळाल्यानंतर संतप्त आंदोलकांनी भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला. तेथेही आंदोलकांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्याचा आहेर लटकविला़ तर एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.जिल्हाधिकारी कार्यालयावरुन मोर्चा खासदार गांधी यांच्या घराकडे निघाला़ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोर्चा गांधी यांच्या घरासमोर पोहोचला़ त्यावेळी गांधी यांच्या बंगल्याचे गेट बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता़ कोणालाही गांधी यांच्या बंगल्यात प्रवेश करु दिला गेला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचा आहेर अर्पण केला़ त्याचवेळी एकाजणाने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी तातडीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला व संबंधिताला ताब्यात घेतले. अनिल हजारे असे या आत्मदहन करणा-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा आंदोलक आमच्यासोबत आलेला नाही, तो कोठून आला हे माहिती नसल्याचे अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन : खासदार गांधींच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:04 PM