कोेपरगाव : गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी परिसरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन बाजार समितीसमोर तीन तास धरणे आंदोलन केले. दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रजासत्ताकदिनी रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शहरातील निवारा, सुभद्रानगर, ओमनगर, द्वारकानगरी व खडकी भागातील गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका हा महत्वाचा रस्ता आहे. अनेक दिवसांपासून हा रस्ता जागोजागी उखडून पुर्णत: खराब झाल्याने नागरीकांना दररोज धुळीचा त्रास सहन करावा लागतो. बाजार समितीचे पाणी रस्त्यावर येते. रस्ता दुरूस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र काम न झाल्याने सदर रस्त्याचे कॉंक्रीटीकरणासाठी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश कवडे, सचिव सुधीर डागा, अजित लोहाडे, राजेंद्र पाखले यांनी आज सकाळी नऊ वाजता धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनास भाजपा-शिवसेना नगरसेवकांनी पाठींबा दिला. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी २५ जानेवारीच्या पालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देऊन प्रजासत्ताकदिनी कामाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, पराग संधान, बांधकाम सभापती जनार्दन कदम, पाणी पुरवठा सभापती स्वप्नील निखाडे, नगरसेवक रवींद्र पाठक, सत्येन मुंदडा, अरीफ कुरेशी, हाजी महेमूद सय्यद, संजय पवार, शिवाजी खांडेकर, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचा या आंदोलनास पाठींबा आहे. वास्तवत: जुन महिन्यातच या रस्त्याचे भुमिपूजन झाले होते. तत्कालिन सत्ताधा-यांनी या रस्त्याचे अंदाजपत्रक अचूक करायला हवे होते. पण, पुन्हा नवीन अंदाजपत्रक तयार करावे लागले. त्याची निविदा निघुन ठेकेदाराने कामही घेतले. मग,फ्लेक्स बोर्ड लाऊन नसती उठाठेव कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे, विरेन बोरावके, संदीप पगारे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, विजय आढाव, फकीरमहंमद कुरेशी, दिनार कुदळे, नवाज कुरेशी, अनिरूध्द काळे आदींनी केला आहे.
या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होणे गरजेचे होते. पण, सोयी ऐवजी गैरसोयी वाढल्या. या भागात अनेक समस्या आहेत. बाजार समितीसमोरील गटार मोठी व्हावी. तुम्ही रस्ता करा, आम्ही लोकसहभागातुन सुशोभिकरण करण्यास तयार आहोत. या परिसराची स्वच्छतेची जबाबदारी आम्ही घेऊ.-काका कोयटे, अध्यक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन
काम चांगले व्हावे म्हणून या रस्त्याचा पुर्वीचा १३ लाखांचा कार्यारंभ आदेश रद्द करून नव्याने ३३ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. दोनदा निविदा काढाव्या लागल्याने वेळ गेला. सर्व नगरसेवक शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते होण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. २५ जानेवारीला पालिका सभेत अधिकृत मान्यता मिळताच प्रजासत्ताक दिनी रस्त्याचे काम सुरू होईल. गटारीचे बांधकामही होईल. रस्ता देखभालीसाठी ५ जणांची समिती नेमली जाईल. स्वच्छतेसाठी १ कोटी ६५ लाखाची तरतुद केली आहे. शहर स्वच्छ राहीले तर आरोग्य चांगले राहील. मतांच्या राजकारणात शहराचे वाटोळे झाले.पण, मतांचा विचार न करता चांगल्यासाठी वाईटपणाही घेऊ. पेट्रोल पंप चौक सुशोभिकरण ‘कोसाका’ करणार आहे. संजीवनी उद्योग समुह सुध्दा काही चौक व रस्ते सुशोभित करणार आहे. सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास करू. टाकळी नाका परिसराचे ‘गौतम बुध्द नगर’ नामकरण केले जाईल. पालिकेत राजकारण न करता समाजकारण करू.-विजय वहाडणे, नगराध्यक्ष