अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर निघोज येथे पत्रकार संघाच्यावतीने उपोषण करण्यात आले. नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विसापूर गावात बंद पाळण्यात आला. नगर-कल्याण महामार्गावर भाळणी येथे रास्ता रोको करण्यात आला.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नेवासा तालुक्यातील करजगाव व लांडेवाडी येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा स्वच्छता सेवक मंडळाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या देऊन पाठिंबा दिला. पाठिंब्याचे निवेदन नेवाशाच्या तहसिलदारांना देण्यात आले. उपोषणाला पाठिंबा म्हणून या सेवकांनी तहसिलदारांना पाठिंब्याचे निवेदन देऊन तहसीलच्या दालनातच ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले. यावेळी स्वच्छता सेवक अशोक काळे, गोपीनाथ बेंबळे, रावसाहेब काळे, रावसाहेब लोहकरे, रामदास माकोणे, उमेश कंक, दिनकर टेमक, राधाकिसन पुराने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठेतील व्यवहार बंद होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. या आवाहनास प्रतिसाद देऊन बाजारपेठेत कडकडीत बंद बाळण्यात आला. ग्रामस्थ, व्यापारी व कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध करुन अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
भाळवणीत रास्ता रोको
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाळवणी येथील एस.के.आर.चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांबरोबरच तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली. यावेळी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सुलतानभाई शेख, नंदकुमार ठुबे, अशोक रोहोकले, सैनिक बँकेचे संचालक अरूण रोहोकले,डॉ. संतोष गुंजाळ, लक्ष्मण रोहोकले, बबन डेरे, प्रकाश रोहोकले, दादू पट्टेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आले.
प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन जागृती
नगर-पुणे महामार्गावर म्हसणेफाटा टोल नाका येथे सकाळी ११ वाजता समर्थचे विद्यार्थ्यांनी प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलनाची जागृती करुन आंदोलन केले. कोणाचीही अडवणूक न करता आंदोलन केले. सुपा पोलीस यांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात होता. यावेळी सेनेचे निलेश लंके, समर्थचे संचालक कैलास गाडिलकर, सबाजी गायकवाड, भोयरेचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, पोलीस निरीक्षक पाटील, शेख पठाण उपस्थित होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी केली.
पत्रकार संघाचे उपोषण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निघोज परिसर पत्रकार संघाचे सर्व सदस्यांनी निघोज ग्रामपंचायत कार्यालयातील पढवीत मंगळवारी सकाळी नऊ वाजता लाक्षणिक उपोषण केले. यात जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, संतोष इधाटे, अनिल चौधरी, सतिष रासकर, शिरीष शेलार, भास्कर कवाद, भगवान श्रीमंदीलकर, संजय पुंड, कारभारी बाबर, दत्तात्रय गाडगे, मनिषाताई बाबर, विजय वराळ, बाबाजी वाघमारे, जयदीप कारखीले, सागर आतकर, संदीप गाडे, संपत वैरागर, रोहन उनवणे आदींनी सहभाग घेतला.