अहमदनगर - मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब, मुंडेसाहेब समाजकारण करत होते. मुंडेसाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. आतापर्यंत तुम्ही 10 वर्षे खासदार होते. पण, आतापर्यंत एकदाही तुम्ही आमच्या सारसनगर भागात आला नाहीत, अशा शब्दात सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने खासदार दिलीप गांधी यांना खडे बोल सुनावले. त्यावर, उलट उत्तर देताना खासदार गांधी यांचाही पारा चढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचारांचा झंझावत सुरू आहे. या प्रचारासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. त्यावेळी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सारस नगर येथील भगवान बाबा चौकात सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने भरसभेत भाजपा खासदाराला खडे बोल सुनावले. तसेच मुंडेसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका, असा सल्लाही दिला. त्यानंतर, खासदार गांधी यांनाही राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. विकास काय करायचा हे आम्हाल माहितीय ना, खासदारानं नगरपालिकेच्या गटारीचं काम करायचं नसतं. आम्हाला माहितीय तुमचं कोणाचं काय दुखतंय ते, अशा शब्दात खासदार गांधी यांनी त्या कार्यकर्त्याला उत्तर दिल. विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या. गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यास गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर तोही शांत झाला. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येत आहे.