अहमदनगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात अपहरण आणि खंडणीची फिर्याद देणा-या सालासार फोर्ड शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांच्या विरोधात खासदार गांधी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे शो-रुमबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात बिहाणी यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी बिहाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.नागापूर एमआयडीसीमध्ये सालासार फोर्ड शो-रुम आहे. या शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांनी काही महिन्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे नगरसेवक पुत्र सुवेंद्र गांधी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी खासदार गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गांधी व बिहाणी यांच्यामध्ये जुना वाद असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. सालासार फोर्ड शो रुममधून २०१५ साली इंडिवर गाडी घेतली होती. पण ती गाडी जुनी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार खासदार दिलीप गांधी यांनी सालासार फोर्ड शो-रुम विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सालासार फोर्ड शो-रुमचे भुषण बिहाणी यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला आहे.या बद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी सांगितले, सालासार फोर्ड शो-रुमला गाडी विक्री प्रमाणपत्र दिले आहे. खासदार दिलीप गांधी यांनी सालासार फोर्ड शो-रुममधून घेतलेल्या गाडीच्या विक्री संदर्भात जुनी गाडी दिल्याची तक्रार आमच्याकडे दिली होती. त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी फोर्ड इंडिया लिमिटेडला ई-मेल करुन संबंधित चेसी क्रमांकाच्या गाडीची माहिती मागवली. दोन दिवसांपूर्वी आम्हाला फोर्ड इंडियाकडून मेल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. फोर्ड इंडिया लिमिटेडने मेलमध्ये म्हटले आहे की, सालासार फोर्डला या चेसी क्रमांकाची गाडी विकलीच नसून ही गाडी सिक्वेल मोटर्स नागपूर यांना दिली आहे. ही गाडी २०१२ च्या बनावटीची आहे, हे सिद्ध झाले आहे. सालासार फोर्डने २०१५ चे खोटे कागदपत्रे तयार करुन खासदार दिलीप गांधी यांना गाडी विकली आहे. खोटे कागदपत्रे तयार करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यानुसार ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमांतर्गत सालासर फोर्ड शो-रुमचे भूषण बिहाणी यांच्यावर मोटार वाहन निरिक्षक अविनाश दळवी यांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. खोटे दस्तावेज करणे ही शासनाचीही फसवणूक आहे. अशा किती ग्राहकांना सालासार फोर्डने जुन्या गाड्या विकून फसवणूक केली आहे, याचा तपास आम्ही करत आहोत. सालासार फोर्ड शो-रुमला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नोटीस दिली असून, फोर्ड इंडिया लिमिटेडकडून प्राप्त झालेल्या ई-मेल बाबतचा खुलासा मागविला आहे. या नोटिसीची मुदत उद्या संपत असून, त्यांचे उत्तर आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सालासार फोर्ड शो-रुमवर कारवाई करणार असून, व्यवसाय प्रमाणपत्रही रद्द करणार आहे.
खासदार गांधींविरोधात फिर्याद देणा-या बिहाणी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 8:16 PM