संगमनेर : संगमनेरातील दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक अपहार झाला आहे. या पतसंस्थेत ठेवी असलेल्या ठेवीदारांनी विविध मागण्यांसाठी येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. रविवारी (दि. १५) खासदार सदाशिव लोखंडे यांनी येथे येऊन ठेवीदार आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांच्या संदर्भाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या मुंबईत भेट घेणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.
संगमनेरातील दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत अपहार झाला आहे. त्या संदर्भाने पोलिसांत गुन्हा दाखल आहे. संस्था अध्यक्ष भाऊसाहेब कुटे व त्यांच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना चोवीस तासांत अटक करा. २१ आरोपी, कर्जदार आणि जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करा व त्यासाठी मंत्रालयातून अध्यादेश मिळावा व ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात. आदी मागण्यासाठी संस्थेच्या ठेवीदारांनी शनिवारपासून (दि.१४) आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनकर्त्यांची खासदार लोखंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेचे उत्तर अहमदनगर जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे, शहर संघटक भूषण नरवडे, उपशहराध्यक्ष मयूर शेलार, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद सूर्यवंशी, अल्पसंख्याक शहरप्रमुख कमरअली मन्सुरी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, वाहतूक सेना उपतालुकाप्रमुख योगेश जाधव, शहरप्रमुख बाळासाहेब व्यव्हारे, वैद्यकीय सेल तालुकाप्रमुख महेश उदमले आदी यावेळी उपस्थित होते.
संगमनेरातील दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक अपहार झाला आहे. शेतकरी, कष्टकरी, दुकानदार, व्यापारी आणि नोकरदारांनी या पतसंस्थेमध्ये लाखोंच्या ठेवी गुंतवलेल्या आहेत. त्यांना त्यांचे कष्टाचे, हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजेत. गुन्हा दाखल असलेल्यांना अटक झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. - सदाशिव लोखंडे, खासदार