संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ते शिंदे गटाला आणि भाजपला जाऊन मिळाले. लोखंडे यांना आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला. मंगळवारी (दि. १९) शिवसेनेच्या संगमनेर शहर कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.
शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, दीपक वन्नम, इम्तियाज शेख, गोपाल लाहोटी, युवा सेनेचे तालुका प्रमुख राजू सातपुते, शहर प्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख फैजल शेख, गटप्रमुख रवींद्र गिरी, शाखाप्रमुख अजीज मोमीन, महिला आघाडीच्या शहरप्रमुख संगीता गायकवाड, आशा केदारी, सुर्दशन इटप, अनुप म्हाळस, अक्षय गाडे, सचिन साळवे, विजय भागवत, वैभव अभंग, दानिश खान, मुस्ताक पारवे, अक्षय बिल्लाडे, फिरोज कतारी, तौसिफ रंगरेज आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गद्दार हे तुडवलेच जातीलखासदार सदाशिव लोखंडे यांना शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्यांनी निवडून दिले. मात्र, त्यांचे पक्षासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले नाही. आजवर त्यांची प्रतिमा ‘मिस्टर इंडिया’ अशीच आहे. त्यांना मतदारसंघातील प्रश्नच समजलेले नाहीत. शिवसैनिकांच्या सुख-दु:खात त्यांचा कधी सहभाग नव्हता. फितूर गटाला ते सामील झाले. शिवसेनेत गद्दारीला अजिबात थारा नाही, गद्दार हे तुडवलेच जातील. असा इशारा शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनी दिला.