अहमदनगर : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला.पारनेर येथील आंबेडकर चौकात दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुजय विखे बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्या मुद्यावर शिवसेनेची स्थापना झाली आहे. तो मुद्दा आज बाजूला गेला आहे. यामुळे शिवसैनिकांचे मतपरिवर्तन होताना दिसत आहे. यामुळे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी भाजपबरोबरच असतील, असेही विखे म्हणाले.
केंद्र सरकारकडून जर या प्रश्नाबाबत अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यातील सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हे तीन पक्षाचे सरकार आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळ हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचे चित्रच महाराष्ट्रात पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले, अशी यावेळी टीका विखे यांनी यावेळी केली.