'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:00 PM2024-01-04T20:00:02+5:302024-01-04T20:00:25+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
Supriya Sule ( Marathi News ) : शिर्डी (जि. अहमदनगर) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबीर होत आहे. आज या शिबीराचा शेवटचा दिवस होता, राज्यभरातून या शिबीरासाठी पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ना न घेता निशाणा साधला. "जे लोक दिल्ली वाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्यासोबत मी लढणार नाही, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल. माझ भाषण रेकॉर्ड करुन ठेवा. सत्तेवर आल्यानंतर पहिली सही ही अंगणवाडी सेविकांसाठी असेल. तसेच धनादेशावरील पहिली सही ही शेतकऱ्यांसाठी असेल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी धनादेशावर मुख्यमंत्री सही करेल. यावेळी खासदार सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.
"जो गरीब असतो त्याच्याशी कधीच लढायचे नाही. लढायचे असेल तर आपल्यापेक्षा ताकदवर असतात त्यांच्याविरोधात लढायचे असते. त्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही. मी त्यांच्याशी लढणारही नाही. जे दिल्लीवाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्याशी काय लढायचे, लढायचे असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीशी लढा, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार
मोदी सरकारला हटविण्यासाठी ठराविक कार्यक्रम इंडीया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. वाढती बेरोजगार, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण आम्ही ठरविणार आहोत. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना सांगणायचे आहे की, येत्या निवडणूकांमध्ये आपण सहकारी पक्षांना सोबत घेऊन सामाेरे जाणार आहोत. एकट्याने जाणार नाहीत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जी आव्हाणे आहेत, त्यातून असे दिसते जनमानसातून पर्याय दिला पाहिजे, नक्कीच त्यास जनतेचा पाठींबा मिळेल. त्या कामाला तुम्ही तयार रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या शिबिरात शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला महत्त्व देण्याचे काम देशात सुरू आहे. हिंदूत्वावर आधारीत फॅसीझम त्यांना आणायचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे. सर्वक्षेत्रात खासगीकरण, नफेखोरीला प्राेत्साहन, मुस्लिम समाजाविरूध्द द्वेश वाढवणे, स्वायत्त संस्थांवर कब्जा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, धर्माच्या नावाखाली पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखविणे अशा मुद्द्यातून भारतीय जनता पक्ष जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.