अहमदनगर - मनात जिद्द आणि आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन मार्गक्रमण केल्यास काहीही अशक्य नसते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे... हे वाक्य अहमनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या कल्याणीने सार्थ ठरवून दाखवलं आहे. एमपीएससी परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर धुणी-भांडी करणाऱ्या आईची लेक आता मॅडम बनल्या आहेत.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या पाहून आपणही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली पाहिजे, असे कल्याणीला वाटायचे. त्यातूनच, मनाशी खुणगाट बांधत तिने प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं. एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली अन् पहिल्या प्रयत्नातच कल्याणीने यश मिळवले. कल्याणी थेट सहाय्यक अभियंता श्रेणी १ या पदावर जाऊन पोहोचली आहे.
संगमनेर शहरातील अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर असणाऱ्या संजय गांधी नगर परिसरात संगीता अहिरे या आपल्या दोन मुलांसह छोट्याशा घरात राहतात. कल्याणी व नवनाथ ही दोन्ही मुले लहानपणापासूनच हुशार होती. मात्र, आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई संगिता यांना दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायला जावे लागत. मात्र, आईने कष्ट करुन दोन्ही मुलांना शिक्षणाचे धडे दिले.आपल्या आईचे होणाऱ्या हाल पाहून कल्याणीही जिद्दीला पेटली होती. बारावीनतर तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांच्या महाविद्यालयात अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या येत होत्या. त्यावेळी, आपण देखील एक दिवस या शासकीय अधिकाऱ्यांसारखे प्रशासनातील अधिकारी बनून शासकीय गाड्यांमध्ये येऊ, अशी खूनगाठ तिने मनाशी बांधली. त्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरू केली.
घरी कायम अठरा विश्व दारिद्र्य होते, त्यात आई दुसऱ्याच्या घरी धुणं भांडीचे काम करत असल्याने पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणे आणि शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कल्याणीने घरीच राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात नावलौकीक कामगिरी केली. सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देऊन कल्याणी उत्तीर्ण झाली. या परीक्षेचा निकाल कानी पडताच तिच्या आईला अत्यानंद झाला व भावाचा आनंद गगनात मावेना. लेकीनं करुन दाखवलं, कष्टाचं चीज झालं, अशी भावना आईने यावेळी व्यक्त केली.