अहमदनगर : मुख्यमंत्री शिंदे साहेब, तुम्ही देखील एक रिक्षावाले होतात. आता मुख्यमंत्री झालात. त्यामुळे रिक्षावाल्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करा, असे साकडेच जिल्हा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटेनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी घातले. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयात याबाबत निवेदन दिले असून, सरकारने याबाबत वेळकाढूपणा करू नये, असेही घुले यांनी सांगितले.
माळीवाडा बस स्टॅण्ड येथे अहमदनगर जिल्हा ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या पार्सल गेट रिक्षा सेवा मंडळाच्या स्टॉपचे उद्घाटन बुधवारी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर घुले बोलत होते. यावेळी दत्ता वामन, अशोक औशीकर, प्रमुख सल्लागार विलास कराळे, लतीफ शेख, सुधाकर साळवे, पोपट कांडेकर, रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष मिथुन चौहान, वसंत मोकाटे, प्रकाश लोंढे, प्रकाश तोरडमल, नंदू डहाळे, बाबासाहेब सत्रे आदी रिक्षाचालक उपस्थित होते.
यावेळी घुले म्हणाले, नगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. प्रवाशांना दळणवळणाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून पूर्ण होईल. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, रिक्षाचालक म्हणजे नगर शहराचा डोळा आहे. सर्वच रिक्षाचालक चांगली सेवा देत असून, ते विविध उपक्रमही राबवितात. सर्वच प्रवाशांची सुरक्षा त्यांच्या हाती आहे. विलास कराळे यांनी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षा चालकांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. दत्ता वामन यांनी आभार मानले.
कल्याणकारी मंडळासाठी निवेदनयावेळी घुले म्हणाले की, महाराष्ट्रात २० लाख परवानाधारक रिक्षाचालक-मालक आहेत. रिक्षाचालकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी २०१४मध्ये एक समिती नियुक्त केली होती. मंडळाला पैसे कोठून आणायचे, काय सवलती द्यायच्या, याचा अभ्यास कमिटीने केला होता. याबाबत कमिटी नियुक्त करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. मात्र, आता नव्याने कमिटी नेमण्याची गरज नाही. मंडळ स्थापन करून त्याचे काम सुरू करावे. आता सरकारने वेळकाढूपणा करू नये. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचेही घुले यांनी सांगितले.