अहमदनगर : राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, या मोहिमेंतर्गत परिमंडळातील विविध कार्यालयांच्या परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यात साडेतीन हजार झाडे लावण्यात आली.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून परिमंडळातील महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये गेल्या आठवडाभरात ५ हजार ९२ वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नाशिक शहर मंडळात ९०१, तर मालेगाव मंडळात ७७१ असे एकूण १६७२ रोपांचे रोपण नाशिक जिल्ह्यात करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात ३४०० वृक्षांची लागवड महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये करण्यात आली. मोहिमेत सहभाग घेत मुख्य अभियंता जनवीर यांनी सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वृक्षारोपण केले. यावेळी नाशिक शहर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता दीपक जाधव, विनायक इंगळे, सचिन पवार यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.