अहमदनगर : वादळी पावसाने जिल्ह्यात फ्लेक्स (फलक) आणि फ्लेक्स लावण्यासाठीचा आराखडा (स्ट्रक्चर) पडून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे यापुढील काळात फ्लेक्स पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधितांवर कारवाई करून नुकसान भरपाई वसूल करण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली आहे.गेल्या आठ दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वा-यासह आलेल्या पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. विजतारांवर वृक्ष उन्मळून पडणे, झाडांच्या मोठ्या फांद्या पडणे याशिवाय फ्लेक्स आणि ते बसविण्यासाठीचे स्ट्रक्चर विजतारांवर पडून वीज पुरवठा बाधित होण्याच्या घटना यावर्षी प्रकषार्ने पुढे आल्या आहेत. फ्लेक्सच्या कारणाने गेल्या पाच दिवसात नाशिक परिमंडळात जवळपास 240 ठिकाणी वीज पुरवठा यंत्रणा बाधित झाली आहे. उच्चदाब वीज वाहिन्यांवर फ्लेक्स किंवा त्यांचा आराखडा पडल्याने दोन उपकेंद्र बंद होण्याचे प्रकार घडले आहेत. दोन्ही खांबांमधील तारांवर अडकलेले फ्लेक्स काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते किंबहुना तशी यंत्रणा तातडीने उपलब्ध होत नसल्याने पुरवठा बाधित राहण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे यापुढील काळात फ्लेक्स किंवा तो बसविण्यासाठीचा आराखडा पडून वीजपुरवठा खंडित झाल्यास संबधित फ्लेक्स बसविणा-या एजन्सीच्या मालकावर कारवाई करून महावितरणचे झालेले नुकसान वसूल करण्याची कार्यवाही यापुढील काळात करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
महावितरण करणार फ्लेक्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 7:01 PM