- प्रशांत शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर - जिल्ह्यातील राहता, राहुरी, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांच्या हद्दीत सरकारी ठेकेदाराकडून वाळू उपसा केला जात आहे. या वाळू उपशाविरोधात मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने शुक्रवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीचे अरुण कडू, भास्कर फणसे, भास्कर दिघे, बापूसाहेब दिघे, आदिनाथ दिघे, अरुण दिघे, सागर कडू, गणेश कडू, नरेंद्र कडू, दिलीप कडू, सूर्यभान डुकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. शुक्रवारी या आंदोलनाला श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार सुधीर तांबे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेना नेते योगीराज गाडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले की, नदीतील वाळू उपशाने प्रवरा परिसर उजाड होणार आहे. पूर नियंत्रणाची भीती दाखवण्यात आली आहे. परंतु पूरनियंत्रण आणि वाळू उपशाचा कोणताही संबंध नाही तसेच नदी खोलीकरणामुळे परिसरातील विहिरींचे पुनर्भरण होण्याऐवजी पाण्याची पातळी खाली जाणार आहे. या परिसरातील बंधाऱ्यांना देखील धोका होणार आहे, असे म्हटले आहे.
पुढे म्हटले की सरकारचे वाळू विक्रीचे धोरण फसले आहे. परंतु त्याची भरपाई प्रवरा परिसरात केली जात आहे. हा वाळू उपसा पाण्यातून केला जात आहे. त्यामुळे मोजमाप करता येत नाही. काही शेतकऱ्यांनी पाईप टाकून मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला तर खड्डे तीस फुटांपेक्षा जास्त गेल्याचे आढळून आले आहे. पालकमंत्र्यांची धोरणे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोक्याची आहेत. त्यामुळे हा वाळू उपसा थांबला पाहिजे, अशी मागणी मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने केली आहे.