घारगाव : मुळा नदीच्या उगमस्थानी अकोले तालुक्यात होत असलेल्या पावसाने जोर पकडल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून जाणारी ही नदी वाहती झाली आहे.हरीचंद्रगड परिसरात उगम पावणारी मुळा नदी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे, घारगाव, बोरबन, आंबी खालसा, अकलापूर व साकुर परिसरातून जाते. सध्या या नदीच्या उगमस्थानी होत असलेल्या पावसाने या नदीला अकोले तालुक्यात पूर आला आहे. हे पाणी या नदी पात्रातून पठारभागात शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजलेच्या सुमारास कोठे खुर्द परिसरात पोहचले व पुढे घारगाव परिसरात ते दहा वाजता आले. नदी पात्रातील पाण्याची आवक चांगली असल्याने हे पाणी आज संध्याकाळ पर्यंत शेजारील मुळा धरणातही पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, संगमनेरच्या पठारभागात भयाण दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. विहिरी,कुपनलिका कोरड्याठाक पडल्या होत्या. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मुळा नदी वाहती झाल्याने नदी काठच्या गावांचा पाणी प्रश्न दूर होणार असल्याने परिसरातील नदीलगतच्या शेतक-यांमधून आनंद व्यक्त होत आहे. पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या निमित्ताने ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पाणी पूजन करण्यात आले.