अहमदनगर : प्रकाशाच्या वक्रिभवनाने विषुवदिनाऐवजी दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान भासणार आहेत, अशी माहिती हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी दिली. २१ जूनला कर्कवृत्त व २२ डिसेंबरला मकरवृत्तावर गेलेला सूर्य २३ सप्टेंबर व २२ मार्चला विषुववृत्तावर येत असल्याने त्याला विषुवदिन म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या त्याच दोन दिवशी सर्व पृथ्वीवर दिवस व रात्र १२-१२ तासांचे समान असतात. पृथ्वीभोवती सुमारे बाराशे किलो जाडीचे वातावरण असून अवकाशातल्या पोकळीपेक्षा त्याची घनता जास्त असते. पृथ्वीकडे येताना ती वाढत जाते. प्रकाशकिरण विरळ माध्यमातून घन माध्यमात येताना वक्रिभूत होऊन स्तंभिकेकडे वळतात. याच कारणाने पाण्यात निम्मी बुडवलेली काठी पाण्याखाली तिरकी दिसते. अगदी याच नियमाने सूर्योदयाच्या थोडावेळ आधी अवकाशातून सरळ येणारे सूर्यकिरणे क्षितीजावरच्या वातावरणाच्या थरात घन माध्यमात प्रवेश करतात. पृथ्वीकडे वातावरणाची घनता वाढत असल्याने ते जास्त वक्रिभूत होऊन सूर्य लवकर उगवल्याचा भास होतो. तसेच सूर्यास्तानंतरही काही वेळ वातावरणाने किरण वक्रिभूत होऊन पृथ्वीकडे येत असल्याने काही वेळ सूर्य असल्याचा भास होतो. म्हणूनच पृथ्वीवर विषुवदिनी दिवस व रात्र समान न भासता त्या दिवशी विषुववृत्तावर दिवस पाच मिनिटांनी मोठा भासतो. मुंबई, अहमदनगर, नांदेड ही शहरे १९ अंश अक्षांशावर असल्याने येथे तो १० मिनिटांनी मोठा भासतो. धु्रवांकडे हा कालावधी वाढत जातो.२७ व २८ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तापासून एक अंशाने किंवा ११३ किलोमीटर दक्षिण गोलार्धात गेलेला असल्याने तांत्रिकदृष्ट्या मुंबई, नगर व नांदेडला रात्र १० मिनिटांनी मोठी व्हायला पाहिजे. पण याच वक्रिभवनाच्या नियमाने सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरही पाच-पाच मिनिटे सूर्यकिरणे येथे मिळत असल्याने नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान म्हणजे १२-१२ तासांचे भासणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
मुंबई, नांदेड, नगरला आज दिवस-रात्र समससमान-हवामानतज्ज्ञ प्रा. बी.एन.शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:32 AM