दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संगमनेर आगारातील वाहक, चालकांना मुंबईला बेस्ट वाहतूक कर्तव्यासाठी पाठवण्यात येत आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट असून, मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संगमनेर आगारातील तीन चालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५०हून अधिक चालक, वाहक हे कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईला बेस्ट कर्तव्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमाकवच मिळत नाही. तसेच आरोग्य सेवा पुरविली जात नाही. कामगार आजारी असले तरी त्यांना जबरदस्तीने मुंबईला पाठविण्यात येते आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटीची सेवा अत्यावश्यक असूनही वाहक, चालक यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणदेखील झालेले नाही. सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाशी निगडित आहेत. याचा गांभीर्याने विचार करावा. त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्यांना बेस्ट कामगिरीसाठी मुंबईला पाठवू नये, असेही निवेदनात म्हटले आहे.
---------------
आमच्या मागण्या मान्य न झाल्याने आम्ही मुंबईला सेवेसाठी गेलो नाही. इतर सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण दोनदा झाले आहे. मात्र, आमच्यापैकी कुणाचेही लसीकरण अद्यापही झालेले नाही. आमच्या मागण्या रास्त असून, अडवणूक करण्याचा आमचा विचार नाही. त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा. आम्ही कर्तव्यासाठी तयार आहोत.
- नंदकिशोर सदाशिव कानकाटे, वाहक, संगमनेर आगार
--------------