अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांचे दालन गुरुवारी दुपारी ताब्यात घेऊन सील केले. तसेच त्यांचा स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या शहरापासून जवळच असलेल्या बुर्हानगर येथील घराचीही पथकाने सायंकाळी झडती घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजूनपर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही. पथकाच्या या कारवाईमुळे महापालिकेसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून गोपनियरित्या महापालिकेत चौकशी सुरू होती. या कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनियत पाळण्यात येत होती. गुरुवारी दुपारी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दोन कर्मचारी महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. त्यांनी आयुक्त जावळे यांच्या दालनासह स्वीय सहाय्यक बसत असलेली खोली ताब्यात घेतली. त्यानंतर काहीवेळाने तक्रारदारासह एक पथक महापालिकेत आले. त्यांनी उपायुक्तांना आयुक्तांच्या दालनात बोलावून घेत चौकशी सुरू केली. ही चौकशी बराचवेळ सुरू हाेती. चौकशीनंतर पथक तेथून निघून गेले. त्यानंतर या पथकाने काही कर्मचाऱ्यांच्या घराची झडती घेतली असल्याचे समजते.
सावेडी ग्रामस्थांनी महापालिकेसमोर वाजविले फटाकेमहापालिका आयुक्त जावळे यांच्यावर कारवाई झाल्याने सावेडी ग्रामस्थांच्या वतीने महापालिकेसमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे माजी पदाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांनी महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा धिक्कार करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी प्रवेशव्दारात फटाके फोडले.