लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेने करवसुली मोहीम हाती घेतली असून, केडगाव प्रभाग कार्यालय समितीतील अधिकाऱ्यांनी बुधवारी खाजगी शाळांसह रुग्णालयांवर कारवाई केली, तसेच शहर प्रभागाकडून जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफीची सवलत दिली होती. ही सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी वसुलीचा आढावा घेऊन वसुली मोहीम हाती घेण्याचा आदेश दिला आहे. महापालिकेचे सावेडी, शहर, बुरूडगाव, झेंडीगेट ही चार प्रभाग कार्यालये आहेत. चार प्रभाग मिळून दररोज एक कोटीच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आल्याने प्रभाग कार्यालयांनी वसुलीच्या मोहिमेला गती देत जप्तीच्या नोटिसा बजावणे, जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केडगाव प्रभाग समिती कार्यालयाचे प्रमुख नानासाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची कारवाई करण्यात आली. एका खाजगी शाळेवर जप्तीची कारवाई करण्यात आली, तसेच रुग्णालयाकडून ४३ हजारांची वसुली करण्यात आली आहे. शहर प्रभाग कार्यालयाने थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. सावेडी प्रभाग कार्यालयाकडून वसुलीसाठी पथक तयार करण्यात आले असून, थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवार व रविवारीही वसुली सुरू राहणार
नागरिकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी महापालिकेने शनिवारी पूर्ण दिवस व रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग कार्यालयांत कर भरणार कक्ष सुरू राहतील. तसा आदेश उपायुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी जारी केला आहे, तसेच या काळात वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचाही आदेश संबंधितांना दिला आहे.