अहमदनगर : कोणात्याही कारणाने आग लागल्यास ती तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते. तशी खबरदारीही घेतली जाते. अहमदनगर महापालिका मात्र याबाबत बेफिकीर असल्याचेच समोर आले आहे. महापालिकेकडे दोनच अग्निशमनबंब आहेत. तेही जुने झाले आहेत. नवीन वाहनांचा प्रस्तावही धूळखात पडून आहे. आगीची मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहर व परिसरात लागलेली आग तत्काळ नियंत्रणात आणता यावी, यासाठी महापालिकेत स्वतंत्र अग्निशमन विभाग कार्यरत आहे. अग्निशमनबंब वेळेवेत पोहोचावा, यासाठी सावेडी व केडगाव, अशा दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उपकेंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. परंतु आग नियंत्रणात आणण्यासाठी लागणारे अग्निशमनबंब तिथे उपलब्ध नसतात. केवळ अग्निशमन केंद्र उभी करून आग नियंत्रणात आणता येते, असाच काहीसा समज महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा झालेला दिसतो.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अग्निशमनबंब उपलब्ध आहेत. ते सन २००८मध्ये खरेदी केले गेले आहेत. एकूण कराच्या २ टक्के अग्निशमन कर लागू करून हा निधी अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी वापरावा, असा प्रस्ताव या विभागाने २००९मध्ये दिला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे या विभागासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. अकरा वर्षे उलटूनही हा कर नगरकरांना लागू केला नाही. कर लागू न झाल्याने नागरिकांची बचत झाली. मात्र, अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. सावेडी कचरा डेपोला गतवर्षी आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी राहुरी व कोपरगाव नगरपालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. शहर व परिसरात आग लागल्यास इतर ठिकाणांहून बंब बोलवावे लागतात. हे या घटनेवरून समोर आलेले आहे. तसेच आग लागल्यास महापालिकेचे अग्निशमन बंब वेळेवर पोहोचत नाहीत, अशी नगरसेवकांचीच तक्रार आहे. असे असताना अग्निशमनबंब खरेदी करण्यास विरोध का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अग्निशमनबंब खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या विभागाला केल्या गेल्या. पण जिल्हा नियोजन समितीत अशी वाहने खरेदी करण्यासाठी तरतूदच नाही. त्यामुळे नवीन बंब खरेदीचा प्रस्ताव जवळपास बारगळला आहे.
...
अपुऱ्या मनुष्यबळामुळे यंत्रणा गाफील
महापालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या १८ कर्मचारी कार्यरत आहेत. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने केडगावातील उपकेंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. सावेडी उपनगरात स्वतंत्र केंद्र आहे. पण, तिथे अग्निशमन बंब नसतो. दोन्ही बंब माळीवाड्यातील मुख्यालयात उभे असतात. या परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात रस्ते अरुंद असल्याने बंब वेळेवेर पोहोचत नाहीत. मनुष्यबळही अपुरे असल्याने त्याचा परिणाम थेट सेवा पुरविण्यावर होत असून, याकडेही महापालिकेचे दर्लक्ष होत आहे.
........