अहमदनगर : शहर व परिसरातील अनधिकृत नळ जोड घेतल्याचे आढळून आल्यास अहवाल तयार करून तो वरिष्ठांना सादर करा. वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे बैठकीत ठरले.
शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, इतके पाणी वसंत टेकडी येथे उपलब्ध होते. त्यामुळे महापालिकेने आता शहर व परिसरातील पाणी वितरणावर लक्ष केंद्रित केले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहरातील पाणी वितरणाबाबत व्हॉल्व्हमनची बैठक घेऊन सूचना केल्या, तसेच शहराच्या काेणत्या भागात किती वेळ पाण्याचा पुरवठा होतो, याची माहिती घेतली. व्हॉल्व्ह सोडताना आजूबाजूच्या चार ते पाच नागरिकांची स्वाक्षरी घेण्याचीही सूचना यावेळी करण्यात आल्या. त्यासाठी प्रत्येक व्हॉल्व्हमनने डायरी सोबत ठेवावी. या डायरीत सर्व नोंदी घेऊन त्याचाही अहवाल वरिष्ठांना सादर करावा. आपल्या कार्यक्षेत्रात जलवाहिनीला कुठे गळती लागली आहे. याचाही शोध घेऊन माहिती द्यावी, जेणेकरून पाणी योजनेची गळती कमी करणे शक्य होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची सभापती घुले यांच्यासह नगरसेवकांनी मागील आठवड्यात पाहणी केली. पाहणीदरम्यान मीटरद्वारे पाणी मोजले असता वसंत टेकडी येथे ५७ एमएलडी म्हणजे ५ कोटी ७० लाख इतके पाणी उपलब्ध होते. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणी पुरेसे आहे; परंतु सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही काही भागांत १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी वितरणातच दोष असल्याचे समोर आल्याने पाणी वितरणाच्या नियोजनावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे.
......
कमी दाबाने पाणीपुरवठा
शहरासह उपनगरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी, यामुळे पिण्याइतकेही पाणी नागरिकांना मिळत नाही. सर्वाधिक तक्रारी कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत आहेत. त्यामुळे याबाबत ठोस निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.