अहमदनगर: शहरातील आगरकर मळ्यातील नागरिकांना काविळीची लागण झाल्याबाबत नाराजी व्यक्त करत पाणी गळती रोखा आणि तपासणीची मोहीम हाती घ्या, अशा सूचना करत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास चांगलाच डोस भरला़शहरातील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना काविळीची लागण झाली आहे़ परिसरातील ३२५ जणांना दूषित पाणी पिल्याने कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य तपासणीत आढळून आले़ यापैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापालिका व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची बुधवारी बैठक घेतली़ बैठकीस महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ़ सतीश राजूरकर, जिल्हा शल्यचिकित्सा विभागाचे प्रतिनिधी पी़ एस़ कांबळे आदी उपस्थित होते़ या बैठकीत कवडे यांनी शहरातील कावीळप्रश्नी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या़तसेच विविध ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़शहरातील बहुतांश परिसरात जलवाहिनी व ड्रेनेजलाईन एकाच ठिकाणी आहेत़ दोन्ही लाईन एकाच ठिकाणी टाकल्याबाबत कवडे यांनी नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांचा मनपाला डोस
By admin | Published: August 27, 2014 11:03 PM