अहमदनगर : महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होत असून, यासाठी नगर शहरासह केडगाव येथील ७६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यातील २० ठिकाणे हे पोलिसांसाठी संवेदनशील राहणार आहेत. शहरातील केडगाव, झेंडीगेट, तेलीखुंट, मुकुंदनगर, सारसनगर आदी परिसरातील मतदान केंद्र संवेदनशील राहणार असल्याने पोलिसांचे या ठिकाणी विशेष लक्ष राहणार आहे. महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी पोलीस व निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी शहरातील विविध मतदान केंद्राची पाहणी केली. येत्या दोन दिवसांत सर्व मतदान केंद्र निश्चित होणार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांना दमदाटी, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत वाद, बोगस मतदान आदी प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मतदानाच्या दिवशी कुठे अनुचित प्रकार आढळून आला तर पोलीस संबंधितांवर तत्काळ कारवाई करणार आहेत. मुकुंदनगरमध्येही राहणार विशेष लक्षमुकुंदनगरमध्ये महापालिका निवडणूक काळात याआधी अनेकवेळा वाद उद्भवले आहेत. मतदारांना दमदाटी, टोळक्याने उभे राहून मतदारांना घराबाहेर पडू न देणे, विरोधी पक्षातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून वाद घालणे आदी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पोलिसांचे मतदानाच्या दिवशी मुकुंदनगर येथे विशेष लक्ष राहणार आहे. या ठिकाणी भिंगार पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे.
नगर मनपा निवडणूक : २० मतदान केंद्र राहणार संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:40 PM