अहमदनगर : देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर आ. जगताप यांची मंगळवारी लाईव्ह मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भूमिका जाणून घेत आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची भूमिका आ. जगताप यांनी ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर थेटपणे मांडली.महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीवर होत आहे, याकडे लक्ष वेधले असता, आ. जगताप म्हणाले, निवडणूक म्हटले की आरोप होतात. मात्र ते काय करतात आणि आम्ही काय केले, याला जाहीर सभांमधून उत्तर देणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशात भाजपची सत्ता आहे. त्यांचाच शहरात खासदार आहे. शहराच्या विकासासाठी काय केले, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. त्यावर ते बोलत नाहीत. आम्ही मात्र आधी काय केले, ते सांगतो, नंतर दुसऱ्यांनी काय नाही केले, ते सांगतो. मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र त्यालाही स्थगिती मिळविण्यासाठी आटापिटा झाला. अन्यथा आजघडीला शहरात चांगले रस्ते दिसले असते.दानवे यांनी ३०० कोटी रुपये आणू, असे सांगितले, याबाबत आ. जगताप म्हणाले, निधी देण्यासाठी यांना यापूर्वी कोणी अडविले होते़ आताही महापौरपद आमच्याकडे द्या तरच निधी देऊ अशी भाषा हे करीत आहेत़ ही नगरकरांना सरळसरळ धमकी आहे, असे जगताप भाजपवर टीका करताना म्हणाले़केडगावचे भांडवल कुणी केले?
केडगाव प्रकरणाचे सेनेने भांडवल केले़ ते सर्वांना माहित आहे़ ते वेगळे सांगण्याची गरज नाही. घटना दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, या घटनेत निष्पाप लोकांना अडकविण्यात आले. ते नगरकरांना माहिती आहे. ज्यावेळी नगरकरांना संधी मिळेल, त्या-त्यावेळी नगरकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. केडगावची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शहरासह जिल्ह्यात जवखेडा, कोपर्डी या दुर्दैवी घटनांमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली. त्यामुळे नगरबाबत इतर ठिकाणच्या लोकांचा गैरसमज झाला. वास्तविक पाहता नगरला सुशिक्षित लोक राहातात. केडगाव घटनेतील दु:ख बाजूला ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. एका घरात दु:खाचा प्रसंग घडला. त्याचे दु:ख झाले नाही. त्याचे भांडवल केले गेले.मुलाखत फेसबुकवर हिटआमदार संग्राम जगताप यांची मुलाखत लोकमत अहमदनगरच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आली. ही मुलाखत तब्बल २० हजार जणांपर्यंत पोहोचली, तर ६ हजार नगरकरांसह जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांनी ही मुलाखत पाहिली.मुलाखत अहमदनगर लोकमत फेसबुक पेजवर लाईव्ह असताना शेकडो नगरकरांनी त्यांना नगरच्या विकासावर प्रश्न विचारले, तर आ. जगताप यांच्या समर्थकांनी सडेतोड मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना ‘लोकमत’ भवनमध्ये निमंत्रित करून त्यांचीही मुलाखत फेसबुक पेजवरून लाईव्ह केली जाणार आहे. यानिमित्ताने शहराच्या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.