डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्वच नगरपंचायती व नगरपालिकांची निवडणूक मुदतीत घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचा यामागे उद्देश दिसून येतो, अशी माहिती प्रभारी नगरपालिका प्रशासन अधिकारी गणेश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, पाथर्डी या नगरपालिकांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. पारनेर, जामखेड, कर्जत, शेवगाव या नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
मागील निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कार्यरत होती. आता मात्र प्रथमच एक सदस्यीय प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकांमधील राजकीय डावपेच यावेळी बदलणार आहेत.
निवडणुकांच्या प्रभाग रचनेसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. त्याच बरोबर मागील निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या हद्दीत झालेले बदल व विकास कामामुळे झालेले भौगोलिक बदल आराखडा तयार करताना विचारात घेतले जातील. २३ ऑगस्टपासून आराखड्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परिपूर्ण माहिती असलेले अधिकारी, संगणक तज्ञ व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रभाग रचना करावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जिल्हाधिकारी स्वतः प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत.
----------
जिल्ह्यातील काही नगरपंचायतींची मुदत संपून पाच ते सात महिने झाले आहेत. डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या नगरपालिकांची प्रभाग रचना पूर्ण व्हायला हवी होती. आताचा घोषित झालेला कार्यक्रम दीड महिना उशिरा होतो आहे.
गणेश शिंदे, प्रभारी, नगरपालिका प्रशासनाधिकारी, नगर.
---------