अहमदनगर : दोन उमेदवारांकडे मालमत्ताकराची थकबाकी असतानाही त्यांना ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी निलंबित केले. जुन्या महापालिकेतील मुख्य लिपिक राजेंद्र शिरसाठ आणि बुरुडगाव कार्यालयातील मोहन काळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्याकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. थकबाकी असतानाही माळीवाडा भागातील शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे आणि भाजपचे उमेदवार सुरेश खरपुडे यांना सदर प्रमाणपत्र देण्यात आले होते, अशी तक्रार महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे करण्यात आली होती. नो ड्यूज प्रमाणपत्राची तपासणी केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. मात्र अशा अर्जांबाबत काही आक्षेप घेण्यात आले होते. या गंभीर प्रकाराची आयुक्त द्विवेदी यांनी दखल घेत चौकशीचा आदेश दिला. याप्रकरणी तपासणी न करणाºया सर्वांनाच नोटिसा दिल्या होत्या. त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर काही कर्मचारी आणि अधिकाºयांनी कोणतीही तपासणी न करता नो ड्यूज प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीत समोर आले.दरम्यान संबंधित दोन्हीही उमेदवारांच्या नावे कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे त्यांच्या नावे रेकॉर्डवर थकबाकी दिसली नाही. सदर रेकॉर्ड पाहूनच सदर प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक असल्याची बाजू कर्मचाºयांनी सांगितली. मात्र ती अधिकाºयांनी ग्राह्य धरली नाही, असे निलंबित कर्मचाºयांचे म्हणणे आहे. खरपुडे या नामसाधर्म्यामुळे काळे यांच्याकडून प्रमाणपत्र दिले होते. मात्र ही चूक लक्षात येताच त्यांनी खरपुडे यांच्याकडून पाच लाख रुपये थकबाकी भरून घेतल्याची बाजू काळे यांनी मांडली आहे.
मनपा निवडणुक : महापालिकेचे दोन कर्मचारी निलंबित, उपायुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:26 PM