लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेचे दोन कर्मचारी गंभीर असल्याने त्यांच्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली; मात्र त्यांनी इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे नातेवाइकांची रेमडेसिविरसाठी धावपळ सुरू होती.
महापालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन कर्मचारी दगावले असून, दोघे जण गंभीर आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सोमवारी दोघे गंभीर झाल्याने त्यांना रेमडेसिविर देण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लाेखंडे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी महापालिकेच्या कोट्यातून देण्याची सूचना केली. त्यानंतर लाेखंडे यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी संपर्क केला. गाेरे यांनी रेमडेसिविर मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु रेमडेसिविर उपलब्ध झाले नाही. अखेर लोखंडे यांनी जिल्हाधिकारी राजेंंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिकेकडे इंजेक्शनचा तुटवडा आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नाही. रेमडेसिविरचा तुटवडा असून, महापालिकेने खरेदी करावे, असे सांगण्यात आले.