अहमदनगर : नगररचना विभागाने जे मार्किंग केले, ते राजकीय दबावाखाली केल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांची घरे अतिक्रमणात असूनही तशीच ठेवण्यात आली. सामान्यांची घरे पाडण्यापूर्वी त्यांची घरे अगोदर पाडा, मग आम्ही स्वत:हून अतिक्रमण काढतो, असे सांगत नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला विरोध केला. बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाने फकिरवाडा ते दर्गादायरा रस्त्यात अतिक्रमण केलेल्या सात घरांच्या संरक्षक भिंती पाडल्या. आयुक्तांनीही कायदेशीर बाबी तपासून समान न्याय देण्याऐवजी कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप नागरिकांनी केला. नगरोत्थान योजनेतून फकिरवाडा ते दर्गादायरा रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. जुन्या लेआऊटमध्ये रस्ता ९ मीटर तर नवीन डीपीमध्ये तो १२ मीटर आहे. तीन दिवसांपूर्वीच नगररचना विभागाने रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणाचे मार्किंग केले. मात्र, हे मार्किंग करत असताना नगरसेवकांच्या नातेवाईकांची घरे सोडून दिली. ज्या ठिकाणी ९ मीटरपेक्षा अधिक रस्ता मोकळा आहे, तेथे अतिक्रमण दाखविले तर जेथे ९ मीटरपेक्षा कमी आहे, तेथील अतिक्रमण दाखविले नाही. अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पथक अतिक्रमण काढण्यासाठी बुधवारी सकाळीच पोहोचले. नगररचना विभागाच्या या दुजाभावामुळे फकिरवाडा परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. माजी नगरसेवक संजय गाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. वस्तुस्थिती समोर असल्याने अधिकारी निरुत्तर झाले. नगररचना विभागाचे अधिकारी तर तिकडे फिरकलेच नाही. तरीही नागरिकांचा विरोध मोडून काढत पथकाने सात घरांच्या संरक्षक भिंती तोडल्या. आयुक्तांची भूमिका संशयास्पदनगररचना विभागाने चुकीचे मार्किंग केल्याचा प्रकार अतिक्रमण विभागाने आयुक्त दिलीप गावडे यांच्या निदर्शनास आणून दिला. तसे केले तर नागरिकांचा रोष पत्कारावा लागेल, असे निदर्शनास आणून देखील आयुक्त गावडेंनी नगररचना विभागाचे समर्थन करत अतिक्रमणांना अभय देण्याचे धोरण स्वीकारले. बुधवारी नागरिकांचा विरोध झाल्यानंतर नगररचना विभाग व आयुक्त फकिरवाड्याकडे फिरकलेदेखील नाही. आयुक्त गावडे हे नगरमध्ये नव्यानेच रुजू झाले आहेत. कोणा अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती घ्यावी, असे मत माजी नगरसेवक संजय गाडे यांनी व्यक्त केले. अतिक्रमणात दुजाभाव होत असेल तर कारवाई होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक नातेवाईकांच्या अतिक्रमणाला मनपाचे अभय
By admin | Published: May 18, 2016 11:44 PM