साहेबराव नरसाळे, अहमदनगर : पाणी प्रश्न, मुलभूत विकास रखडल्यामुळे भिंगारचा अहमदनगर महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी भिंगार येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे. स्थानिकांना सुविधा पुरविण्यासाठी भिंगार छावणी परिषद विसर्जित करुन येत्या तीन महिन्यात अहमदनगर महानगरपालिकेत भिंगार शहराचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवशेनात मांडली.
४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात गुरुवारी (दि.०७) खासदार विखे यांनी भिंगार छावणी परिषदेचा अहमदनगर महापालिकेत समावेश व्हावा, अशी मांडली. विखे म्हणाले, भिंगार छावणी परिषदेची स्थापना १८७९ मध्ये स्थापना झाली. येथे सुमारे २५ हजार लोक वास्तव्यास आहेत. मात्र, भिंगार छावणी परिषद लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी, बांधकाम मंजुरी तसेच स्थानिक मुलभूत सुविधा देताना अनेक समस्या येत आहे. यामुळे भिंगारचा समावेश नगर महानगरपालिकेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी एक महत्वाची बैठक पार पडली आहे. तसेच भिंगारचे नागरिक यांचे मत जाणून घेण्यासाठी नगरमध्ये बैठक देखील पार पडली.
यामध्ये नागरिकांनीही महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश अहमदनगर महापालिकेत करण्यात यावा, अशी मागणी विखे यांनी केली.