अहमदनगर : बुरुडगाव भागातील काळे गल्लीमध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून आचारसहिंता संनियंत्रण पथकाने आज दुपारी दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ३७ हजार रुपये जप्त केले आहेत.बुरुडगावात भागात मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्राजित नायर, तहसीलदार सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे यांच्या पथकाने काळे गल्लीमध्ये चौकशी करून संशयीत संजय कर्डिले व उदय प्रकाश भोसले या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची झडती घेतली असता भोसले यांच्याकडे ३७ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम पथकाने ताब्यात घेतली असून दोघांकडे कसून चौकशी सुरु आहे. या भागातच इतर लोकांकडे चौकशी केली असता प्रत्येकी चार हजार रुपयांचे वाटप सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने पथक पुढील तपास करत आहे.दरम्यान कालच या पथकाने सारसनगर भागात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जेवणावळीवर छापा टाकला होता. त्यानंतर आज पुन्हा कारवाई झाल्याने शहरातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगर मनपा निवडणुक :बुरुडगाव भागात पैसे वाटताना दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:33 PM