श्रीरामपूर : तालुक्यातील मुठेवाडगाव येथे शेती महामंडळाच्या हद्दीत असलेल्या एका वस्तीवर आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून सास-याने तिघा साथीदारांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा तलवारीने वार करून खून केला. शुक्रवारी (दि.८ मे) सकाळी ही घटना घडली.मयताचे नाव मयूर आकाश काळे (वय २८, मूळ रा.कर्जत) असे आहे. तालुका पोलिसांनी मयताची पत्नी मोनिका काळे हिच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन काळे, सुरज काळे व बुंदी भोसले यांना अटक करण्यात आली आहे. संदीप काळे मात्र पसार झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींनी गुरुवारी रात्री मयूर व मोनिका या पती पत्नीकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. सर्व आरोपी हे दारूच्या नशेत होते. दागिने देण्यास नकार दिल्याने वादास सुरवात झाली. वाद विकोपाला जात आरोपींनी मयूर याच्यावर तलवार, लोखंडी पाईप, दांडा व दगडाने जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मोनिका ही जखमी झाली. मयूर याचा भाऊ तैैमूर हा वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले.मयत मयूर हा गेल्या पाच वर्षापासून पत्नीसमवेत सासरी राहत होता. मोनिका हिच्या आईने सचिन काळे याच्या सोबत दुसरा विवाह केला. सचिन काळे याच्या समवेत आईने जावई मयूर याच्याकडून दागिन्यांची मागणी केली होती. त्यासाठी या आरोपींना बोलविण्यात आले होते.
आर्थिक व्यवहारातून सास-यानेच केला जावयाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:18 PM