पाथर्डी : घराचे बांधकाम करणा-या खोसपुरी येथील एका मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील रांजणी येथे मंगळवारी दुपारी घडली.साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतलेला होता. या कामावर दहा दिवसापासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) हे मजुरीने बांधकाम करीत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली असता दुपारी १ वाजता वाळू चालत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपी आले. त्यांनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात, असे सांगितले. त्यामुळे घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले. तरीही त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेले. आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कु-हाडीने घाव घातला. यात साहिल जखमी झाला. त्यास तत्काळ पाथर्डी व नंतर नगर येथे खासगी दवाखान्यात हलवले. परंतु गंभीर दुखापत गंभीर असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रांजणीत बांधकाम मजुराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:54 PM