मंगळवारी (दि.१९) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील सावित्राबाई मोगल शेळके या ८० वर्षाच्या वयोवृद्ध महिलेचा खून झाला होता. कौठेकमळेश्वर गावात शेळके एकट्याच असताना भावड्या येलमामे याने घरात घुसून शेळके यांचा गळा दाबून खून केला होता, तसेच त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे दागिने चोरून नेले होते. दरम्यान, नजीकच राहणारी एक पाच वर्षाची बालिका गोळ्या घेण्यासाठी दुकानात आली असता तिने हा प्रकार पाहिला होता. त्यानंतर येलमामे याने या बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडले व तिच्या अंगावर गोधड्या व कपडे टाकून तिलादेखील मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता.
काही दिवसांपूर्वी सावित्राबाईंनी अश्विनी हिला काही कारणाने मारहाण केली होती. याचा राग मनात धरून भावड्याने सावित्राबाईंचा गळा दाबून खून केला. या प्रकरणाचा तपास करताना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार तपासून पाहिले; मात्र तपासात वेगळाच प्रकार समोर आला.