अहमदनगर : पाच लाखांच्या खंडणीसाठी आरोपींनी वकील दाम्पत्याचे आधी अपहरण केले व नंतर त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे ही धक्कादायक घटना २५ जानेवारीला घडली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे फिरवून २४ तासांच्या आत मुख्य आरोपी व त्याच्या ३ साथीदारांना ताब्यात घेतले. ५ लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजाराम जयवंत आढाव (वय ५२ वर्षे) व मनीषा राजाराम आढाव (वय ४२ वर्षे, दोघे रा. मानोरी, ता. राहुरी) हे वकील दाम्पत्य २५ जानेवारीला त्यांच्या राहत्या घरून राहुरी न्यायालयात गेले. परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. त्यामुळे शंका आल्याने त्यांचे नातेवाईक लता राजेश शिंदे (वय ३८ वर्षे, संगमनेर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. वकील दाम्पत्य हरवल्याची घटना घडल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाच्या सूचना दिल्या. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भीमराज खर्से, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करून शोध सुरू केला.
पथकाने मानोरी ते राहुरी मार्गावरील व राहुरी न्यायालयात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहे, याची माहिती घेतली. त्याचवेळी राहुरी न्यायालय परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेलेली असल्याचे पोलिसांना आढळले. या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग (रा. राहुरी) याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने खंडणीसाठी साथीदारांसह हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला व तीन साथीदारांना अटक केली.