अहमदनगर : घरात टीव्ही पाहण्यावरून दोघा बहीण-भावामध्ये भांडण होऊन भावाने लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा मारून तिचा जागीच खून केला. शहरातील केडगाव येथील शाहूनगर परिसरात शनिवारी (दि. १७) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रुपाली (वय ९, नाव बदलले आहे) असे मयत मुलीचे नाव आहे. मयत रुपाली हिचा मोठा भाऊ राहुल (वय १३, नाव बदलले आहे) याने तिच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून केला. या घटनेबाबत माहिती समजताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
टीव्ही पाहण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहुलने घरातील हातोडा रुपालीच्या डोक्यात मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शेजाऱ्यांना ओरडण्याचा आवाज आल्याने ही घटना समोर आली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.