श्रीगोंदा : न्यायालयाने मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षणास संमती दिलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याप्रश्नी भूमिका उदासीन असल्याचा आरोप मुस्लिम धर्मगुरू व नेत्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला. आरक्षणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील मुस्लिमांनी मंगळवारी मूक मोर्चा नेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व मुस्लिम धर्मगुरूंची सर्वोच्च संघटना असलेल्या 'जमियते उल्माए हिंद' यांनी केले. विजय चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. तत्पूर्वी स्थानिक प्रार्थनास्थळात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. मोर्चा तहसीलवर गेल्यानंतर तहसीलदार वंदना खरमाळे यांना 'जमियत' तर्फे निवेदन देण्यात आले. मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करुन याबाबतचा अध्यादेश त्वरीत काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनात समान नागरी कायद्यास तीव्र विरोध करून मुस्लिम वैयक्तिक कायद्यास पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी ‘जमियत’ चे तालुकाध्यक्ष मौलाना मोहियुद्दीन आत्तार, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना अब्दुल मजीद, मौलाना शमीम कादरी, जमीर शेख, असिफ पठाण, सादिक जमादार, शब्बीर बेपारी, अतिक कुरेशी, गनिभाई जकाते, रफिक इनामदार, इकबाल मुजावर, बबलू जमादार, डॉ. मन्सूर पिरजादे, बादशाह शेख, तौसीम शेख, इरफान शेख, राजू तांबोळी, मुजाहिद शेख, अस्लम शेख, इलाही मालजपते तसेच समाजातील नागरिक मोठ्या संख्येन हजर होते. मुस्लिमांच्या आरक्षण मागणीला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव टिळक भोस, सतीश बोरुडे, समित बोरुडे, राजेंद्र राऊत, गोरख उंडे, ‘शिवसंग्राम’चे मच्छिंद्र सुद्रीक, राष्ट्रवादीचे प्रा. तुकाराम दरेकर यांनी पाठिंबा दर्शविला.मराठा समाजाचा पाठिंबापाथर्डी : मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे या इतर मागण्यांसाठी मंगळवारी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चा काढून पाथर्डी तहसील आवारात सुमारे दोन तास धरणे धरली. मोर्चास मराठा सेवा संघ,पाथर्डी संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार संघटना, रिपब्लिकन पक्ष व सकल मराठा समाजातर्फे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. सकाळी तकीया मशिदीपासून मूक मोर्चास प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरुन तहसीलसमोर पोहोचल्यानंतर धरणे धरण्यात आली. आॅॅक्टोबर हिटच्या उन्हाचा तडाखा असला तरी मोर्चेकरी उन्हात बसून होते. उरी हल्ल्याचा निषेध, शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली, कोपर्डी घटनेचा निषेध, सभी धर्म की एक ही पुकार, एकता को करो साकार, भिन्न वेश, भिन्न भाषा भारत हमारा एक देश, संविधान बचाव देश बचाव, अशा विविध मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. जमीयत उलेमा महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष मौलाना शफीक, मौलाना राजू व शाळकरी मुलांच्या हस्ते तसेच धर्मगुरूंच्या हस्ते तहसीलदार जयसिंग भैसाडे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. मुस्लीम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाचा विषय तातडीने तडीस न्यावा असे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील तिसगांव, माणिकदौंडी, करंजी, टाकळीमानूर, पागोरी पिंपळगांव येथून मुस्लीम बांधव आले होते. बैठा सत्याग्रह सुरु असताना मोर्चेकऱ्यांसाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड मित्रमंडळातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच माजी नगरसेवक बंडू बोरूडे मित्रमंडळातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ‘केदारेश्वर’चे अध्यक्ष प्रताप ढाकणे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सुभाष घोडके, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, नगरसेवक बजरंग घोडके, युवा नेते अमोल गर्जे, प्रवीण राजगुरू, उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, नगरसेवक नंदकुमार शेळके तसेच इतर राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते धरणे आंदोलनात सामील झाले होते. शेवगावात विराट मोर्चाशेवगाव : मुस्लिमांना सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यातील मुस्लीम संघटनांच्या वतीने मंगळवारी शेवगाव तहसील कार्यालयावर विराट मोर्चा नेण्यात आला. मालेगावचे मौलाना हमीद जफर, संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहंमद शहा, जामा मशिदीचे आबेद हाफिज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. मोर्चानंतर तहसीलच्या प्रांगणात धरणे धरण्यात आली. शेवगाव शहरातील सोनमियाँ देवस्थानच्या प्रांगणात सकाळपासूनच शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या समाजबांधवांना मालेगावचे मौलाना हमीद जाफर यांनी मोर्चाच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर खालची वेस, बाजारपेठ, शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. यावेळी मौलाना हमीद जाफर यांच्यासह विविध मौलाना यांनी न्या. राजेंद्र सच्चर आयोग, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त मेहमूद रहेमान समिती यांनी मुस्लीम समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. या शिफारशींची दखल घेऊन मुस्लीम समाजासाठी सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षणाच्या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तहसीलदार दादासाहेब गीते, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जामखेडमध्ये एकजूटजामखेड : ‘एकच मिशन, मुस्लीम आरक्षण’ असे घोषणा फलक हाती घेत मुस्लीम आरक्षणासाठी जमियत उलमा -ए- हिंद च्या नेतृत्वाखाली मंगळवारी जामखेड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हाती हिरवे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमुळे मंगळवारी जामखेडचे रस्ते काही काळ हिरवेगार दिसत होते.धरणे आंदोलन करून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. मुस्लीम वैयक्तिक कायद्यात ढवळाढवळ करु नका, अशीही मागणी यावेळी ठासून करण्यात आली. सकाळपासून मुस्लीम बांधव व्यवसाय बंद ठेवून इदगाह मैदानात एकत्र आल्यानंतर तेथे जोहरची नमाज झाली. मोर्चाचे नेतृत्व उलेमांनी केले. इदगाह मैदानावरून शांत व स्वयंशिस्तीने सरकारी गोदामासमोरुन नगर बीड रस्त्याने खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड रस्त्याने मोर्चा तहसीलवर जाऊन तेथे धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. मौलाना खलील अहमद, मुफ्ती अफजल कासमी, मौलाना इबादूरहेमान यांनी मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे संघटनेचे मुस्लीम पदाधिकारी गटतट विसरून आरक्षणासाठी एकत्र आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लीम तरुणांनी तालुक्यातील गावा गावात बैठक घेऊन मोर्चाविषयी जागृती निर्माण केली होती. मौलाना खलील म्हणाले, आमचा मोठा बांधव मराठा समाजाला १६ टक्के व आमच्या समाजाला ५ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. या मोर्चास सकल मराठा समाज, बौद्ध समाज, लोकाधिकार आंदोलन यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.नेवासा : मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी नेवासा तालुक्यातील सकल मुस्लीम समाजाच्यावतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. मोर्चानंतर धरणे धरण्यात आली. जमीयत उलमा-ए-महाराष्ट्र संघटनेचे जनरल सेक्रेटरी एजाज पटेल यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नेवासा येथील नुरानी मस्जिदपासून दुपारी १२.१५ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात मुस्लीम धर्मगुरुंसह मुस्लीम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, राजेंद्र उंदरे, रावसाहेब घुमरे, डॉ.करणसिंह घुले, सुनील सवई, विजय गाडे आदीही मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला होता. तसेच ओबीसी, दलित, मुस्लीम ऐक्य समितीच्यावतीने दलित बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखधान यांनी पाठिंबा दिला. नेवासा तालुका माळी समाजाच्यावतीने दत्तात्रय काळे, धनगर समाजाच्यावतीने अशोक मिसाळ, समर्पण फाऊंडेशनच्यावतीने डॉ. करणसिंह घुले, नेवासा तालुका वकील संघाच्यावतीने अध्यक्ष गोरक्षनाथ काकडे यांनी पाठिंबा दिला होता. मोर्चाला विविध पक्ष व संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्याचे सत्र दिवसभर धरणे आंदोलनाच्या ठिकाणी सुरूच होते. मुस्लीम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाचा मुद्दा तातडीने तडीस न्यावा अन्यथा जमीयत उलेमा हिंद संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभारील, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला. कर्जत : मुस्लीम समाज आरक्षणप्रश्नी कर्जत तहसील कार्यालयावर १० नोव्हेंबरला मूक मोर्चा काढणार असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक तारेक सय्यद यांनी दिली. मोर्चाच्या नियोजनासाठी कर्जत तालुक्यातील प्रमुख मुस्लीम कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी झाली. मुस्लीम समाज आरक्षणापासून अनेक वर्षांपासून वंचित आहे. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील गावागावांत जाऊन जनजागृती करण्यात येईल. दहा नोव्हेंबरला सकाळी कर्जत तहसीलवर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी तारेक सय्यद, अल्लाउद्दीन काझी, कदीर सय्यद, शब्बीर पठाण, अॅड.जाहीर पठाण, रज्जाक झारेकरी, लतीफ पठाण आदी हजर होते.
आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लीम एकवटले
By admin | Published: October 19, 2016 12:46 AM