लोणी : कोरोनामुळे कुणाचा रोजगार गेला, तर कोणाची आजारपणामुळे जगायची पंचाईत झाली. कुणी भीतीपोटी कोरोना चाचणी करायला धजावत नाही. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील एका २७ वर्षीय तरुणाने माझी कॉलनी..माझी जबाबदारी अशी हाक देत लोणी आणि परिसरातील नागरिकांसाठी चक्क मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी व कोरोना विषयी जनजागृती सुरू केली आहे.
सुहास मायकल ब्राम्हणे असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या स्वतःच्या जागेत फेथलाइन ह्युमन राइट्स फाऊंडेशनचे सहकार्य घेत कोविडचा होत असलेला उद्रेक रोखण्यासाठी लोणी पंचक्रोशीतल्या नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले आहे.
या तपासणी अंतर्गत घराघरातील नागरिकांची सर्दी, ताप, खोकला, ऑक्सिजन लेव्हल, ईसीजी इत्यादींची मोफत तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही रोगाचे निदान आणि कोरोनाची लक्षणे लवकर लक्षात येऊन रुग्णाला पुढील उपचाराला लवकर सामोरे जाता येणार आहे. त्यामुळे रुग्णाला पुढील आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. माझी कॉलनी..माझी जबाबदारी अशी साद घालत सुहास हा डॉ. मीनाक्षी तोरणे व मित्र संकेत भांगे यांना सोबत घेऊन लोणी परिसरातील प्रत्येक कॉलनीत जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती करीत आहेत.
............
अनेकजण केवळ भीतीपोटी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतानाही प्रथमोपचार घ्यायलाही धजत नाहीत. त्यामुळे काही दिवसांनी या नागरिकांची परिस्थिती गंभीर होऊन जाते. हे अनुभवल्यानंतर मित्र संकेत भांगे याने आपली कॉलनी, आपली जबाबदारी ही संकल्पना मांडली. कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती व पुस्तिकेचे वाटप तसेच लसीकरणाविषयी शंका निरसन करण्यात आले. त्यानंतर अनेक नागरिकांची तपासणी सुरू केली आहे.
- सुहास ब्राम्हणे
उपाध्यक्ष, फेथलाइन ह्युमन राइट्स फाऊंडेशन,महाराष्ट्र