राळेगण सिद्धी : लोकपाल नियुक्त करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही. हा जनतेचा विश्सासघात आहे. हृदयविकाराने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत लोकपाल, लोकायुक्ताच्या नियुक्ती करीत नसल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुण्यतिथी (दि. ३० जानेवारी २०१९) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना याबाबतचे लेखी पत्र हजारे यांनी शनिवारी (दि. १) पाठविले. देशात वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने सन २०११ मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी करोडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनातून दि. १ जानेवारी २०१४ रोजी लोकपाल, लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. कायदा पास झाल्यानंतर देशातील जनतेला मोठी आशा निर्माण झाली होती की, आता देशात लोकपाल लोकायुक्तांची नियुक्ती होईल आणि देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल. परंतू या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सत्तेवर आले. पण लोकपाल, लोकयुक्त नियुक्ती झाली नाही. त्यानंतर २३ मार्च २०१८ रोजी मी पुन्हा दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. उपोषण सुरू असताना २९ मार्च २०१८ रोजी पंतप्रधान कार्यालयाने मला लिखित आश्वासन दिले. आम्ही लवकरात लवकर लोकपाल लोकायुक्त नियुक्त करू असे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. लोकपाल नियुक्ती झाली नाही तर मी पुन्हा २ आॅक्टोबर २०१८ पासून राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करीन. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी सांगितले की, लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारला आणखी काही वेळ द्या. त्यांच्या विनंतीनुसार मी गांधी जयंतीपासूनचे उपोषण स्थगीत केले होते. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे, आश्वासनानुसार लोकपाल , लोकायुक्त नियुक्ती झाली नाही तर आपण महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण आंदोलन करू, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.नियुक्तीत टाळाटाळ...लोकपाल लोकायुक्त नियुक्तीसाठी केंद्र सरकारशी तब्बल तीस वेळा पत्रव्यवहार केला. परंतू पंतप्रधानांनी एकाही पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. विरोधी पक्ष नेता नाही, ज्येष्ठ विधिज्ञ नाही अशी वेगवेगळी कारणे सांगत सरकार लोकपाल नियुक्ती टाळत राहिले. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर लोकपाल नियुक्त करण्याविषयी केंद्र सरकारला अनेकदा फटकारले. तरीही काही ना काही कारणे देत केंद्राने गेल्या साडेचार वर्षात लोकपाल नियुक्ती करण्याचे टाळल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
देशासाठी मृत्यू आला तर माझे भाग्य : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 3:50 PM