अहमदनगर : सासरी नांदत असलेल्या अनेक विवाहितांना माहेरची ओढ लागली आहे मात्र कोरोनामुळे त्यांना सासरचा उंबरठा ओलांडताना येईना. मुलीच्या भेटीसाठी आतूर झालेली आईपण तिच्या माहेरी गेली नाही. कोरोनामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीने सध्या अनेक कुटुंबात अशी भावनिक ओढाताण निर्माण केली आहे.
गेल्या एक ते सव्वा वर्षांपासून सर्वत्रच कोरोनाचे सावट निर्माण झाले. शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने प्रवासावरही बंधने आली. घराबाहेर पडल्यानंतर संसर्ग होण्याची भीती. अशा परिस्थितीत घरातील पुरुष मंडळीच कामानिमित्त बाहेर पडतात. महिला चार भिंतीच्या आतच राहतात. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला. जनजीवन सुरळीत होण्यास प्रारंभ झाला, तोच कोरोनाची दुसरी लाट आली. अशा परिस्थितीत अनेक विवाहितांना आपल्या माहेरी जाताच आले नाही. माहेर जवळ असलेल्या महिलांना जाणे-येणे शक्य झाले मात्र ज्यांचे माहेर लांब अथवा दुसऱ्या जिल्ह्यात आहे त्यांच्यासाठी सध्या जाणे-येणे खूपच कठीण झाली आहे. त्यामुळे सध्या अनेक सासूरवासींनी कोरोना संपण्याची वाट पाहत आहेत.
...........
माझं माहेर माहेर...
कोरोना कमी झाला की, माहेरी जाईल असे ठरले होते, पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. सर्वत्र रुग्ण वाढत असताना प्रवास करणे धोक्याचे आहे. आता माहेरी जाण्यासाठी पुन्हा वाट पहावी लागेल.
- सरस्वती बाचकर, विवाहिता
...........
माहेर दुसऱ्या जिल्ह्यात आहे. सध्या प्रवासासाठी पास लागतो. अशा परिस्थितीत कसे जाणार. आई-वडील आणि माहेरच्या इतर नातेवाइकांशी फोनवरच संपर्क करून ख्याली-खुशाली विचारत आहे.
-सविता हाके, विवाहिता
.............
लागली लेकीची ओढ
मुलीच सासर दुसऱ्या जिल्ह्यात असल्याने वर्ष झाले अहे तसे तिला माहेरी येता आले नाही. आम्ही तिची वाट पाहत आहोत. हा कोरोना लवकर संपवा हीच प्रार्थना आहे.
- कल्पना कांबळे, विवाहितेची आई
.............
मुलगी आणि तिच्या मुलांशी फोनवर संपर्क होतो. पण प्रत्यक्ष भेट होईना. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवास करणे धोकादायक आहे. आता कोरोना संपला की पहिल्यांदा मुलीला भेटायला जाईल.
-लता लोखंडे, विवाहितेची आई
............
मामाच्या गावाला जाता येईना
आम्ही आधी सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचो आता मात्र एक वर्षापासून मामाच्या गावाला गेलो नाही. मामाच्या गावाची खूप आठवण येते.
- ऋषिकेश गर्द
............
शाळेला वर्षभरापासून सुटी आहे. पण घरातच थांबावे लागत आहे. या सुट्यांचा काहीच उपयोग होईना. मामाच्या गावाला जायला कधी भेटेल काय माहित.
- रुद्र बोरुडे