जामखेड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच ग्रामपातळीवर लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, कोरोना चाचणी वाढविणे, लसीकरण होण्यासाठी गावातील पदाधिकारी यांनी मतभेद विसरून एकत्र यावे. विविध उपाययोजना राबवाव्यात. पंचायत समितीने विशेष नियोजन केले आहे. माझे गाव माझी जबाबदारी या अंतर्गत १० सूत्री कार्यक्रमाचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पाठवून साथरोग प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यात सध्या ८२६ बाधित रूग्ण आहेत. आतापर्यंत ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोळे कोविड सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये ९०० च्या आसपास खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे यापुढील काळात ऑक्सिजन व खाटांचा तुटवडा होऊ नये यासाठी गावांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि माझे गाव माझी जबाबदारी हे उपक्रम राबवावेत. गाव कोरोनामुक्त होण्यासाठी
प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावात बाधित रूग्णांची संख्या जास्त असेल, तर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ ची कठोर अंमलबजावणी करावी, मास्क व सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करावा, गाव सोडिअम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक करावे, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेचे नियोजन करावे, आरोग्य विभागामार्फत संशयित असलेल्या सर्व कुटुंबाचे व गावात एकही रूग्ण राहता कामा नये यासाठी सर्वेक्षण करून कोरोना चाचणी करावी. बाधित रूग्णांना शासकीय कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल करावे. जे नकार देतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची कोरोना चाचणी करावी. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास वेळ लागणार असल्याने त्यांना गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
---
लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळा..
सार्वजनिक, खासगी, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणावेत. लॉकडाऊनच्या काळात कुठलेच कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेणे, लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. कोरोना काळात शाळा, अंगणवाडी केंद्र बंद असेल, तर संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस हे कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे, असे आवाहन कोकणी यांनी ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
---
२३ परशुराम कोकणी