योगेश गुंड
केडगाव : दरवर्षी पंढरपूरची आषाढी वारी आली की वारकरी गळ्यात टाळ अडकवून विठूरायाचा नामघोष करीत पंढरपूरला दाखल होतो. वारकºयाने गळ्यात अडकवलेला टाळ हा नगरमध्ये तयार झालेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये घुमणारा नगरी टाळांचा नाद निशब्द झाला आहे. टाळ तयार करण्याची नगरमध्ये १२५ वर्षांची जुनी परंपरा आहे. राज्यातील वारकरी कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्याच्या गळ्यातील टाळ मात्र नगरीच असतो.
पंढरपूरची आषाढी वारी जशीजशी जवळ येते. तशा विठूरायाचा नामघोष करीत दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. हातात भगवी पताका, गळ्यात टाळ घेऊन वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. पंढरपूरमध्ये गुंजणारा टाळांचा नाद हा खास नगरमध्ये तयार केलेल्या टाळांचा असतो. नगरमध्ये बापूराव भिकाजी गुरव यांच्यापासून टाळ बनवण्याची परंपरा सुरू झाली. या परंपरेला आता १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. गुरव परिवाराची आता चौथी पिढी टाळ तयार करण्याच्या व्यवसायात आहे. नगरमध्ये तयार होणारा टाळ हा शुद्ध काशाचा बनला जातो. त्यामुळे त्याचा नाद लांबत राहतो.
हे टाळाचे खास वैशिष्ट्य असल्याने राज्यभर नगरी टाळ वापरला जातो.राज्यातील जवळपास ७० ते ८० टक्के वारकरी नगरी टाळ वापरतात. टाळा सोबत पखवाज व विणाही नगरचीच असते हे विशेष. पंढरपूर, आळंदी येथे टाळ विक्रीची दुकाने असली तरी त्यातील टाळ हे नगरमध्ये बनविलेले असतात. नगरमध्ये जेव्हा पखवाज ९० रूपयांना मिळायचा तेव्हापासून विक्री व्यवसाय सुरू झाला.
आता हेच पखवाज १० हजार रूपयांपर्यंत विक्रीस आहेत. ११० रूपये किलो टाळाची किंमत होती ती आता १ हजार रुपये किलो झाली. दरवर्षी दिंडीसाठी जवळपास २ हजार टाळांचे जोड विकले जातात. यंदा कोरोनामुळे दिंडीला परवानगी नसल्याने जेमतेम १०० टाळही विकले गेले नाहीत. कोरोनाचा परिणाम टाळ, मृदुंग, पखवाज, विणा यांच्या व्यवसायावरही झाला आहे. कारागिरांचा रोजीरोटीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.