प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर- अहमदनगर-जामखेड महामार्गावरील कडा येथील तात्पुरता पूल वाहून गेल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. नगर मार्गे जामखेड, बीड, उस्मानाबादला जाणारी वाहतूक वाहतूक बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
गेल्या वर्षभरापासून जामखेड-नगर मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच कडा येथील जुना पूल पडला होता. यामुळे पर्यायी तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता. सोमवारी रात्री कडा, आष्टी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कडी नदीला पूर आला होता. या पुरात तात्पुरता पूल वाहून गेला आहे. यामुळे नगर-जामखेड मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
मराठवाड्यातील वाहनांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नगर-जामखेड महामार्गाचा पर्याय आहे. तसेच जामखेडसह आष्टी तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी नगरला शाळा, कॉलेजसाठी ये-जा करतात. कडा येथील पूल वाहून गेल्याने या प्रवाशांना सोलापूर रोडने मिरजगाव-माहीजळगाव-जामखेड या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
या मार्गाचा अवलंब करानगरकडे जाणारी वाहतुक कडामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कडा ते धामणगाव मार्गे तर आष्टीकडून जाणारी वाहतुक शिराळ मार्गे मिरजगाव, अहमदनगरसाठी वळविण्यात आली आहे. तसेच नगरहून सोलापूर रोडने मिरजगाव-माहीजळगाव-जामखेड हा देखील पर्याय आहे.