अहमदनगर : आज, दि. १५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. शाळा,महाविद्यालये, जीम मात्र ३१ आॅक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. याआधी फिरण्यावर रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंदी होती. त्यातही एक तास ढील देण्यात आली असून रात्री १० ते पहाटे पाच पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, जीमला मात्र बंदीच आहे. व्यावसायिक प्रदर्शन भरविण्यास मात्र मान्यता देण्यात आली आहे. बिझनेस टू बिझनेस असे प्रदर्शन भरविण्यास परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे.