अहमदनगर - अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गेल्या १३२ दिवसांत नगर जिल्ह्यात १७ हजार ६८३ घरकुले पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्हा ११ हजार घरकुले पूर्ण करून दुसऱ्या स्थानी आहे.
अमृत महाआवास अभियानात केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना असे मिळून लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यानुसार शहरी भागातील लोकांना एक लाख २० हजार, तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक लाख ३० हजार रुपये सरकारकडून अनुदान मिळते. २०१६-१७ पासून ही योजना सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ७६९ घरकुलांना मंजुरी मिळाली व त्यातील ५१ हजार ३७४ घरे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, राज्यात घरकुलांची कामे संथ गतीने सुरू असल्याने शासनाने २० नोव्हेंबर २०२२ पासून घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.
मागील चार महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन केले. त्याचे फलित म्हणून गेल्या १३२ दिवसांत १७ हजार ६८३ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. अभियान काळातील हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर ११ हजार घरकुलांसह गोंदिया जिल्हा आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व गट विकास अधिकारी, डीआरडीएचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.
केंद्राचे १३२९४, तर राज्याचे ४३८९ घरकुले पूर्ण
अमृत महाआवास अभियानात ३१ मार्च २०२३ पर्यंत अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्यपुरस्कृत योजनेत राज्यात प्रथम आला आहे. केंद्र योजनेत १३ हजार २९४, तर राज्यपुरस्कृत योजनेत ४ हजार ३८९ घरकुलांचे कामे पूर्ण झाले आहे.
केंद्राच्या योजनेत जामखेड पुढे
प्रधानमंत्री आवास योजनेत संख्येनुसार जामखेड, अकोले, कर्जत व राज्यपुरस्कृत योजनेत कर्जत, नेवासा, जामखेड या तालुक्यांनी उल्लेखनीय काम केले. एकूण उद्दिष्टामध्ये सर्वाधिक २१७९ घरकुले कर्जतमध्ये, त्यानंतर २१४० घरकुले जामखेड, तर २०३५ घरकुले नेवासा तालुक्यात पूर्ण झाले.