अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला.
यंदा कोरोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे एकही दिवस वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. पैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे १९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसते आहे. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.